लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट भाड्याने घेताना दोन मुलेच राहणार असल्याचे सांगितल्यानंतर पूजा तेथे राहायला आल्याने फ्लॅटमालकाने अरुण राठोड याला फ्लॅट सोडायला सांगितला होता. मात्र, तातडीने दुसरी जागा मिळणे मुश्कील असल्याने दुसरी जागा मिळेपर्यंत येथे राहण्यास परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती पुढे आली आहे. त्यादरम्यान, पूजाच्या आत्महत्येचा प्रकार घडला.
अरुण राठोड याने हेवन पार्क येथील फ्लॅट १ जानेवारी रोजी ११ महिन्यांच्या भाडेकराराने घेतला होता. त्या वेळी आम्ही दोन मित्र राहणार असल्याचे सांगितले होते. त्या ठिकाणी पूजा चव्हाण ही ३० जानेवारी रोजी राहायला आली. हे समजल्यावर घरमालकाने चौकशी करुन तुमच्या दोघांशिवाय मुलगी कशी राहायला आली. तेव्हा राठोड याने मित्राची चुलत बहीण असल्याचे सांगितले. त्याबाबत माहिती काढली असता ते बहीणभाऊ नसल्याचे समजल्यावर घरमालकाने त्यांना फ्लॅट खाली करण्यास सांगितले होते. मात्र, इतक्या तातडीने दुसरीकडे जागा मिळणार नाही. जागा मिळेपर्यंत राहू द्या, असे अरुण राठोड याने घरमालकाला सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणीही तक्रार करण्यास पुढे आले नाही. पुजा चव्हाण हिच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.