पुणे : वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीपासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये सत्तापदे मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष या पदांबरोबरच विविध समित्यांची अध्यक्षपदे तसेच सदस्यपदे मिळवण्यासाठी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातही स्पर्धा सुरू झाली आहे. महापौरपदाचा घटनात्मक कार्यकाल अडीच वर्षांसाठी आहे. पण सगळ्याच राजकीय पक्षांनी तो सव्वा वर्षांचा केला आहे. विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांची पक्षाने दिलेली सव्वा वर्षांची मुदत लवकरच संपुष्टात येत आहे. यावेळी हे पद महिला राखीव व खुल्या गटासाठी आहे. ते अडीच वर्षांचे असल्यामुळे भाजपाला या पदावर खुल्या गटातीलच महिलेला संधी द्यावी लागेल. अशांची संख्या भलीमोठी आहे. त्यामुळेच ज्येष्ठता, राजकीय हितसंबध, राजकीय आकलन, वक्तृत्व असे निकष लावून पक्षाला या पदासाठी निवड करावी लागणार आहे. वर्षा तापकीर, माधुरी सहस्रबुद्धे, मानसी देशपांडे, तसेच आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले याही महापौर पदासाठी इच्छूक आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ त्यांच्याच नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे समितीतून निवृत्त झाले आहेत. आता या पदासाठी सुनील कांबळे, हेमंत रासने हे दोन मोठे दावेदार आहेत. दोघेही ज्येष्ठ आहेत. दोघांनाही याआधी फार मोठी संधी मिळालेली नाही. कांबळे यांचे बंधू दिलीप कांबळे राज्यमंत्री आहेत तर रासने यांनी महापौरांच्या प्रभागातील आहे, म्हणून आता आपल्यावर आणखी किती अन्याय करणार, अशी विचारणा पक्षाकडे केली असल्याची चर्चा आहे. दोघेही सभागृहातील कामकाज सक्रिय झाले असून सातत्याने आपला चेहरा पुढे कसा राहील, या प्रयत्नात असतात. दोघांमधील चुरस टाळायची म्हणून तिसºयाच एखाद्या युवा नगरसेवकाकडे हे पद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे १० सदस्य आहेत, त्यांना स्थायी समितीत एक जागा मिळते. त्यामुळेच त्यांच्यातही स्पर्धा आहे. मनसेचे फक्त दोन सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना संमितीविनाच राहावे लागते, पण आंदोलने करून, विविध विषय हाताळून हे दोन्ही सदस्य कायम चर्चेत रहात असतात.अरविंद शिंदे यांचे गटनेतेपद धोक्यातफक्त १० सदस्य असतानाही काँग्रेसमध्ये रस्सीखेच मात्र जोरदार आहेत. सभागृहातील सर्वाधिक ज्येष्ठ असलेल्या आबा बागूल यांना मागील वर्षात सहाव्यांदा निवडून येऊनही एकदाही संधी मिळालेली नाही.स्थायी समितीत पाठवावे, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे. गटनेते म्हणून अरविंद शिंदे यांना यातून मार्ग काढावा लागणार आहे, कारण स्थायीमध्ये दुसरे नाव दिले तर बागूल यांच्यासह उर्वरित नगरसेवकांकडून त्यांच्या गटनेतेपदावर संक्रात येण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सलग पाच वर्षे विरोधी पक्षनेता व आताही पुन्हा गटनेता असे पद त्यांना मिळाले आहे.याशिवाय महिला बालकल्याण, शहर सुधारणा या महत्त्वाच्या समित्यांबरोबरच विधी, नाव, क्रीडा अशा समित्याही आहेत. त्यांच्या अध्यक्षपदासाठीही काहींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच अनेक नगरसेवकांनी स्थायी समितीत सदस्य म्हणून निवड करण्याची मागणीही पक्षाकडे केली आहे. भाजपाच्या तब्बल ९८ सदस्यांमध्येही आता दोन गट पडल्यात जमा आहेत. एक गट पालकमंत्री गिरीश बापट यांना मानणारा तर दुसरा पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनाच नेता समजणारा आहे. पहिल्या वर्षात काकडे गटाच्या सदस्यांना सत्तापदाची फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता हा गट आक्रमक झाला असून एकत्र राहून पक्षाकडे सत्तापदांसाठी दबाव टाकू लागला आहे.विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचेही सभागृहात ४५ सदस्य आहेत. विरोधी पक्षनेता हे महत्त्वाचे पद त्यांच्याकडे आहे. सहसा ते बदलत नाहीत. पण त्यासाठीही काहीजण तयारी करत असल्याची चर्चा आहे. स्थायी समितीत त्यांचे ४ जण जातात. त्यांच्यातील २ जण चिठ्ठीने निवृत्त झाले आहेत. आता त्या जागेवर आणखी दोघांना पाठवावे लागणार आहे. स्थायी समिती महत्वाची समिती असल्याने ही संधी मिळावी म्हणून पक्षातील ज्येष्ठांपासून अनेकजण प्रयत्न करीत आहेत.
महापालिकेत पदे मिळवण्यासाठी सर्वपक्षीय रस्सीखेच, अरविंद शिंदे यांचे गटनेतेपद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:22 AM