पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील ( Aryan Khan Drugs Case) पंच असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) यांने नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. किरण गोसावीला पुणेपोलिसांनी ताब्यात घेतल्यावर न्यायालयाने त्याला ५ नोव्हेबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून ८ नोव्हेंबरपर्यंत तो तुरुंगात असणार आहे.
पुणे पोलिसांनी घेतले होते ताब्यात
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून पंच करण्यात आलेला फरार किरण प्रकाश गोसावीच्या मुसक्या पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आवळल्या होत्या. आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचे सांगत परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेक तरुणांना गंडा घातला आहे. खंडणी उकळल्याचे आरोपही त्याच्यावर होते. परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला फसवणुकीच्या तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात तो फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्याला लुकआऊट नोटीस बजावली होती. मुंबईतील क्रुझ पार्टीत अटकेतील आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कात्रजमधील मांगडेवाडीतील लॉजमधून ताब्यात घेतले होते.
५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती
किरण गोसावीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. गोसावी याच्याविरुद्ध कापूरबावडी, अंधेरी, कळवा या पोलीस ठाण्यांत एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. त्याला ४ एप्रिल २०१९ रोजी फरार घोषित केले होते. गोसावीने बनावट कागदपत्रांचा वापर करून तरुणांकडून पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. फरार असल्याच्या काळात तो कोठे फिरला याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.