भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:12 PM2024-04-23T14:12:13+5:302024-04-23T14:14:40+5:30
ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला त्याच बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यावर आली आहे.
Rohit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली असून कुटुंबातील सदस्य एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला त्याच बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
"अजितदादा हे पवारसाहेबांना वडील म्हणतात. मात्र स्वत:चं व्यावसायिक साम्राज्य वाचवण्यासाठी ते आता वडिलांना सोडून भाजपसोबत गेले आहेत. २०१९ ला पार्थ पवार हे श्रीरंग बारणे यांच्याविरोधात निवडणुकीत उभा होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. अजितदादा वडील म्हणून मुलाच्या पराभवाचा बदला घेणार नसतील, पण हा भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इथं प्रचार करण्यासाठी आला आहे," असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
पार्थ पवारांच्या सुरक्षेवरूनही हल्लाबोल
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना नुकतीच सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, "पार्थ पवारांना वाय दर्जाची काय झेड दर्जाची सुरक्षा द्यायला हवी होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा हे बारामतीत अडकून बसल्याने लोकल नेते झाले आहेत. सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याने गृहमंत्र्यांकडून नेत्यांच्या मुलांना सुरक्षा दिली जात आहे. सागर बंगला हा नेत्यांचा मुलांना सुरक्षा देतो आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडतो," अशा शब्दांत रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे. मात्र समोरून कसलेही डावपेच आखले तरी विजय आमचाच होणार, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. "दिशाभूल करण्यासाठी ही त्यांची रणनीती आहे. मात्र लोकांना माहीत आहे कोणतं बटण दाबायचं आणि कोणाला निवडून द्यायचं. आम्ही लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे हे फालतू खेळ त्यांना लखलाभ असोत," असं रोहित पवार म्हणाले.