मुंबई - पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदी यांनी हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. आता, राष्ट्रवादीला रयत शेतकरी संघटनेते नेते सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदींसोबत लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. यातच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना असायला हवे होते, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खंत व्यक्त केली होती. आता, मिटकरींना सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का?. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत. तो आठवावा शपथविधी....! असं खोचक ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. तसेच, आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना मेन्शनही केलं आहे.
काय म्हणाले होते मिटकरी
अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे. मोदीजी चूक दुरुस्त करा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, प्रोटोकॉलनुसार विमानतळावरील स्वागतासाठी पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. मोदी यांना अजित पवारांनी हात जोडले. मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यामुळे अजित पवार यांच्या भाजपप्रेमाविषयीच्या राजकीय चर्चेला दुपारी सोशल मीडियावर उधाण आले.
मोदींनी भाषणासाठी खुनावले
देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर फडणवीस यांनी पाच मिनिटांचे भाषण केले. प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलणे अपेक्षित होते. मोदी यांनी पवार यांना भाषणासाठी खुणावलेही; परंतु त्यांनी नकार दिला. मोदी यांनी २० मिनिटांचे भाषण केले.
हा महाराष्ट्राचा अपमान : खा. सुळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण नाकारले जाते. पण, याच मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी दिली जाते, ही बाब दुर्दैवी असून, महाराष्ट्राचा अपमान करणारी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केली. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना बोलू द्यायला पाहिजे होते. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकार राजकारण करते हे अजिबात शोभणारे नाही, असे महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.