किरण शिंदे
पुणे - निवडणुकीत आपलाच माणूस विजयी व्हावा यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत असतात. त्यातही ग्रामपंचायतची निवडणूक असेल तर बात काही औरच असते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर असे काही प्रकार पाहायला देखील मिळाले. पुण्यातही एक असाच प्रकार घडला. मित्र सरपंच झाल्यानंतर एकाने तब्बल एक किलोमीटर भर रस्त्याने दंडवत घालत नवस पूर्ण केला.
पुणे जिल्ह्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चित्तरंजन गायकवाड यांची निवड झाली. 2520 मतांनी ते निवडून आले. मात्र ही निवडणूक होण्याआधी त्यांचा मित्र विकास कदम यांनी गणपतीला नवस केला होता. जर मित्र निवडून आला तर मुख्य रस्त्यापासून दंडवत घालत दर्शनाला येईल असा हा नवस होता आणि झाले ही तसेच. निकालाच्या दिवशी सुरुवातीपासून आघाडी घेणाऱ्या गायकवाड यांनी विजय मिळवला. आणि विकास कदम यांनी देखील आपला नवस पूर्ण केला.
गाव खेड्यातील राजकीय जनमताचा कौल मांडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील 7000 हून अधिक ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालात अनेक दिग्गजांना धक्के मिळाले तर नवख्या उमेदवारांना लॉटरी लागली. ज्यांचा विजय झाला त्यांनी मात्र अनोख्या प्रकारे विजयाचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचीच राज्यभरात चर्चा सुरू आहे. मात्र पुण्यातील या तरुणाने मित्राच्या सरपंच पदासाठी केलेला नवस ज्याप्रकारे भेटला त्याची आता चर्चा सुरू आहे.