धनकवडी : शहरासह उपनगरात डोळ्यांची साथ वेगाने वाढतेय, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पद्मावती येथील (कै.) शिवशंकर पोटे दवाखाना, धनकवडी येथील (कै.) विलासराव तांबे दवाखाना, कात्रज, संतोषनगर येथील हजरत मौलाना युनूस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखाना व दत्तनगर जांभूळवाडी येथील स्व. रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा चार ठिकाणी आठवड्यात तब्बल १२ हजार ८२८ रुग्णांची तपासणी केली असून त्यामध्ये ५७८ रुग्ण ‘आय फ्लू’ या डोळ्यांच्या साथीने बाधित आढळून आले आहेत.
शहरासह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून ‘आय फ्लू’ या डोळ्यांच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. (कन्जक्टिव्हायटिस) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, क्षेत्रीय शिक्षण अधिकारी शरद यादव यांच्या सहकार्याने महापालिकेच्या थोरवे शाळेपासून कात्रज डेअरीपर्यंत विद्यार्थ्यांची आरोग्य रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले यांनी यावेळी व्यक्त केले.
या मोहिमेसाठी क्षेत्रीय शिक्षण अधिकारी शरद यादव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल खडके, डॉ. कविता धिवार, डॉ. ज्ञानदा गवळी, परिचारिका सुनीता काशिद, थोरवे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
संसर्ग झाल्याची लक्षणे
डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे यांचा समावेश होतो. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.