पुणे : शहरात दिवसेंदिवस विविध साथीचे आजार वाढत असताना, फूड पॉयझिंनगचे प्रमाण देखील यात मोठे आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने, तसेच आर्थिक हितसंबंध असल्याने बनावट खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच फावते आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेने कर्नाटक येथून टेम्पोद्वारे शहरात येणारे ४ हजार ९७० किलो बनावट पनीर पकडले. हे पनीर शहरातील अनेक छोट्या-मोठ्या दुकान, हॉटेलमध्ये विक्री केले जायचे अशी माहिती देखील पोलिस तपासात समोर आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनंतर कात्रज चौकात पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्या पथकासोबत सापळा रचला. यावेळी एक टेम्पो कर्नाटक येथून शहरात प्रवेश करत असताना पकडला असता, त्यात हे बनावट पनीर आढळून आले. ही कारवाई ५ जुलै रोजी करण्यात आली, यानंतर जप्त पनीर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त झाला आणि संबंधित पनीर हे भेसळयुक्त तसेच मानवी शरीरास घातक असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील यांच्या पथकाने केली.