पुणे : शहरातील एटीएममध्ये छेडछाड करून बँकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल ४९ एटीएम मशिनमधून १ कोटी २८ लाख ७६ हजार ५२० रुपयांची लूट करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन कंपनीतर्फे अमित चव्हाण (वय ५०, रा. ठाणे) यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार १४ डिसेंबर २०१७ ते १६ एप्रिल २०१९ या कालावधीत शहरातील स्टेट बँकेच्या ४९ एटीएममध्ये घडला आहे. टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लि. या कंपनीतर्फे स्टेट बँकेचे एटीएम सेंटर बसविण्यात आले आहे. एक राजस्थानी टोळी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढायला जाऊन पैसे येण्याच्या अगोदरच मशिनचा पाॅवर सप्लाय बंद करून, आलेली कॅश ओढून काढायची. पाॅवर बंद झाल्याने बँकेत व्यवहार अर्धवट झाल्याची नोंद व्हायची. अशा प्रकारे या टोळीने शहरातील ४९ एटीएम सेंटरमधून पैसे काढून तब्बल १ कोटी २८ लाख ७६ हजार ५२० रुपयांची फसवणूक केली आहे.
हद्दीच्या वादात गुन्हा दाखल करायला लावली ५ वर्षे
टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन कंपनीकडून सायबर पोलिसांकडे पाच वर्षांपूर्वी एक तक्रार अर्ज करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी पिंपरी चिंचवडला हा प्रकार घडला म्हणून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हा अर्ज पाठवला. त्यांनी तो पुन्हा पुणे पोलिस आयुक्तालयाकडे पाठविला. कंपनी केवळ ऑनलाइन तक्रार करत होती. त्यानंतर पिंपरी, पुणे करण्यात तीन तपास अधिकारी बदलले गेले. अखेर पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले यांच्याकडे हा तक्रार अर्ज आल्याने त्यांनी आता गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे गुन्हा कोणी दाखल करायचा यावर पुणे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात परस्परांवर टोलवाटोलवी झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.