-निलेश राऊत
पुणे : ‘हर घर तिरंगा’ योजनेंतर्गत महापालिकेला शासनाकडून व सीएसआरमधून प्राप्त झालेल्या १२ लाख राष्ट्रध्वजांपैकी तब्बल ८ लाख राष्ट्रध्वज निकृष्ट दर्जाचे व राष्ट्रध्वज मानकाप्रमाणे नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी, हे ८ लाख ध्वज पुन्हा पुरवठादारांकडे परत करण्यात आले आहेत, तर क्षेत्रीय कार्यालयांना वितरित करण्यात आलेल्या ध्वजांपैकी जे ध्वज मानकांप्रमाणे नाहीत त्यांचे वितरण थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
‘हर घर तिरंगा’ची घोषणा झाल्यावर आठ ते दहा दिवसांत राष्ट्रध्वज बनविण्याची लगीनघाई सुरू झाली. प्रारंभी हजारात महापालिकेकडे आलेले राष्ट्रध्वज गेल्या तीन-चार दिवसांपासून लाखांमध्ये पुरवठादारांकडून येऊ लागले होते. मात्र, यामध्ये ७० टक्के ध्वज हे मानकांप्रमाणे नसल्याने ते परत पाठविण्यात आले आहेत.
महापालिकेकडे प्राप्त झालेल्या राष्ट्रध्वजांपैकी ३० ते ३३ टक्के ध्वज हे मानकांप्रमाणे आहेत. उर्वरित ध्वजांचा आकार, तीनही रंगांचे आकारमान एकसारखे नसणे, ध्वज काठीत घालण्यासाठीची उलट सुलट शिलाई, अशोक चक्र मध्यभागी नसणे, सुमार दर्जाचे कापड, त्यावर रंगीत डाग असे प्रकार आढळून आले आहेत.
दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार सर्वांपर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविणे गरजेचे असल्याने, या ध्वजांची रात्रंदिवस तपासणी करून ते घरोघरी पोहोचवण्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात जे राष्ट्रध्वज वितरित झाले आहेत. त्यामध्ये अनेक ध्वजांचा दर्जा हा निकृष्ट असल्याने, शहराच्या विविध भागांतील नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त करत रोषही व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेने शुक्रवारी सायंकाळपर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांना सुमारे ६ लाख ७५ हजार, सामान्य प्रशासन व इतर विभागांना २० हजार ९०० आणि पुणे विद्यापीठाला ९७ हजार ५०० राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, यापैकी अनेक राष्ट्रध्वज हे निकृष्ट दर्जाचे असल्याचेही समोर आले आहे.
पुणे महापालिकेने नागरिकांसाठी मोफत राष्ट्रध्वज पुरविण्यासाठी पुढाकार घेताना, काही पुरवठादारांकडून याची मागणी केली. सीएसआरमधून यांचे पैसे दिले गेले असले तरी, बहुतांश पुरवठादारांनी हे ध्वज गुजरातमधील सूरत आणि काहींनी नागपूर येथील उत्पादकांकडून मागविले आहेत. दरम्यान, सर्वच स्तरांतून महापालिकेकडून वितरित झालेल्या राष्ट्रध्वजांबाबत तीव्र नाराजी असल्याने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राष्ट्रध्वज केले परत
कोथरूड येथे राहणारे प्रशांत भोलागीर यांनी त्यांच्या घरी नेऊन देण्यात आलेला असा चुकीचा ध्वज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना परत नेऊन दिला; तर गोखलेनगर येथील सचिन बहिरट आणि बाबा सय्यद यांनीही अशोकचक्र मध्यभागी नसलेला ध्वज परत केला असून, महापालिकेने अशा ध्वजांचे वाटप रोखावे, अशी मागणी केली आहे. ध्वज परत करत ध्वजांचा अवमान करणाऱ्या ध्वज उत्पादकांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
महापालिकेने बहुतांश राष्ट्रध्वज सीएसआरअंतर्गत मागविले आहेत. राज्य शासनानेही महापालिकेला अडीच लाख ध्वज दिले होते; परंतु ते सर्वच खराब असल्याने पुन्हा परत पाठविण्यात आले आहेत. महापालिकेला ज्या पुरवठादारांनी ध्वज पुरविले आहेत, त्यांचे सूरत आणि नागपूर येथे उत्पादन झालेले आहे. महापालिकेने सुमारे ११ लाख ९४ हजार राष्ट्रध्वज मागविले होते. त्यांपैकी सुमारे ७० टक्के ध्वज हे खराब निघाले आहेत. मानकाप्रमाणे सुस्थितीत असलेले ध्वज वाटप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यानंतरही नजरचुकीने मानकाप्रमाणे नसलेले ध्वज मिळाले असतील तर ते नागरिकांनी परत करावेत, अशी आमची विनंती आहे.
- आशा राऊत, उपायुक्त, भांडार विभाग, पुणे महापालिका.