पुणे : सर्वसाधारणपणे रुग्णाच्या पित्ताशयातून दहा ते बारा किंवा १५ च्या दरम्यान खडे निघतात. परंतु, पुण्यातील एका ३० वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून तब्बल एक हजाराहून अधिक खडे काढण्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आली. ही गुंतागुंतीची आणि आगळी - वेगळी शस्त्रक्रिया लॅपरो ओबेसो सेंटर येथील लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी केली.
कविता (नाव बदलले आहे) या महिलेला गरोदरपणात ओटीपोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. सोनोग्राफी केली असता सिस्टिक डक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिच्या पित्त-मूत्राशयाच्या भागात मोठ्या प्रमाणात खडे जमा झालेले दिसून आले. गर्भधारणा आणि येणाऱ्या प्रसूतीमुळे तिची पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. प्रसूतीनंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी ही शस्त्रक्रियेची प्रक्रिया २० मिनिटांत पूर्ण झाली. यात १ ते २ मिमी हिरवट पिवळे खडे सापडले. शस्त्रक्रियेनंतर २० तासांच्या आत महिलेला घरी सोडण्यात आले आणि ती तिच्या बाळाला स्तनपानदेखील करू शकली.
पित्त, क्षार हे यकृतामध्ये तयार होणारे पाचक घटक आहेत, जेव्हा ते शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा ते कडक होतात आणि दगडांचे रूप धारण करतात. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत सर्वसाधारणपणे दहा-बारा खडे निघतात; परंतु, या महिलेला इतक्या माेठ्या प्रमाणात खडे निघण्याची ही दुर्मिळ घटना आहे. यासाठी वेळीच निदान व उपचार करणे महत्त्वाचे आहे.
- डाॅ. शशांक शहा, लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन