Video: राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार; 'स्वराज्यरक्षक संभाजी महाराज' नावाचे १० हजार स्टिकर छापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:54 PM2023-01-06T15:54:13+5:302023-01-06T16:12:07+5:30
"स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात टीका -टिप्पणी व काही तुरळक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पहिल्यांदाच पुणे शहरात दाखल झाले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने "स्वराज्यरक्षक संभाजी महाराज" या नावाच्या दहा हजार स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर, घरांच्या दरवाजांवर व दुकाने- आस्थापनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त लोकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्याबाबत आपली भूमिका रुजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा व जल्लोषाने संपूर्ण वातावरण अजितदादामय झाले होते. "एकच वादा.. अजितदादा..." ,"आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे.." , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अशा प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने "स्वराज्यरक्षक संभाजी महाराज" नावाचे 10 हजार स्टिकर, अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन #pune#AjitPawarpic.twitter.com/yTJTx2DJsH
— Lokmat (@lokmat) January 6, 2023
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार
मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला "स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज" याच नावाने संबोधणार, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली.