पुणे : बालसुधारगृहातून बाहेर आलेल्या एका मुलाने तेथील कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना येरवडा येथील सरगम हॉटेलजवळ सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राजेंद्र देडे (वय ५१, रा. चिखली) हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडापोलिसांनी या मुलावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालसुधारगृहात देडे हे कर्मचारी म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपी अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याचे देडे यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांची या मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाली. देडे हे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधून भाजी घेऊन जात होते. तेव्हा या मुलाने त्यांना अडविले. मी बालसुधारगृहात असताना तुला लई माज आला होता का, तुला दाखवतोय, तुझा खेळच खल्लास करतो, असे म्हणून त्याने हातातील कुर्हाडीने देडे यांच्या डोक्यात वार केला. देडे याने वार चुकविल्याने कुर्हाडीचा वार त्यांच्या हाताच्या पंजाजवळ, मनगटावर लागून गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर अधिक तपास करीत आहेत.