पुणे - पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या नेत्यांची देशात धरपकड सुरु झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला होता. यादरम्यान, PFIच्या समर्थकांनी पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर, या घोषणाबाजीविरोधात अनेकांनी आवाज उठवला. राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात हरहर महादेवची घोषणा देत आंदोलन केलं होतं. आता, सरकारने पीएफआयवर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मनसेनं आनंद व्यक्त केला.
देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे भाजपसह देशभरात स्वागत होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातही या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, त्यासोबतच त्यांच्या संलग्नित ६ संघटनांवरही बदीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे मनसेनं लाडू वाटप करत या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसेने फटाके वाजवून आणि लाडू वाटप करुन जल्लोष साजरा केला.
पीएफआय ही देशविरोधी संघटना असून पुण्यातील आंदोलना दरम्यान, ज्या घोषणा देण्यात आल्या त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या संघटनेवर बंदी आणावी आणि घोषणाबाजी करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती, त्या मागणीला यश आले आहे, असे पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी म्हटले. तसेच, त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही जल्लोष साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात पीएफआय संघटनेनं घोषणाबाजी केल्यानंतरही मनसेनं आंदोलन केलं होतं.