धायरी : कुत्रे मागे लागल्यामुळे सायकल जोरात चालविण्याच्या नादात बारा वर्षीय युवक खाली पडला. सायकलचे हॅण्डल त्याच्या पोटात घुसले आणि तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धायरी येथील गणेशनगर परिसरातील लेन नंबर २३ येथे घडली.
महापालिकेची श्वान निर्बीजीकरणाची मोहीम थंडावल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. नागरिकांकडून कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. महापालिकेच्या निष्काळजीमुळे नागरिक जखमी होताहेत. अशा मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे यांनी केली आहे.
सकाळी शाळकरी मुले, शिक्षक, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि रात्री घरी परतणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांवर ही कुत्री हल्ले करतात. तसेच मोकाट कुत्रे चावण्याच्या घटनाही या परिसरात घडल्या आहेत. कुत्र्यांच्या वावरामुळे धायरी फाटा, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी या भागात हा त्रास मोठ्या प्रमाणांवर आहे. मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही त्रास होत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. काही जणांकडून कुत्रे पाळले जातात; परंतु त्यांना फिरविण्यासाठी बाहेर काढले असता ते कुठेही घाण करतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण होऊन त्याची दुर्गंधी सुटते. यात कुत्र्यांचे मालक सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे वडगाव बुद्रुक येथील रहिवासी चंद्रशेखर पोकळे यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिकेकडे सातत्याने तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
कुत्रे की दहशतवादी
सिंहगड रस्ता परिसरात शेकडो मोकाट कुत्री उच्छाद मांडत असताना त्यांना पकडण्याची सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मोकाट कुत्र्यांपासून संरक्षण करण्यांसाठी नागरिकांनी अनेक ठिकाणी पाण्याच्या बॉटलममध्ये लाल पाणी भरून त्या गेटवर बांधल्याचे पाहायला मिळते. मोकाट कुत्रे हे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणांवर भुंकत असून त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत आहे.