पुणे : गाडीला काळ्या काचा लावून वर पोलिसांवर रुबाब करणार्या पोलिसाची चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे चौकशीत निष्पन झाले. विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस शिपाई याप्रकरणी सागर बाजीराव पाडळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओमकार विलास धर्माधिकारी (वय ३२, रा. मु. पो. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक केली आहे. ही घटना अलका टॉकिजजवळील टिळक चौकात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
पोलीस शिपाई सागर पाडळे व त्यांचे सहकारी टिळक चौकात वाहतून नियंत्रण करीत होते. त्यावेळी टिळक चौकातून केळकर रोडला एका ईटीस कारला काळ्या काचा लावलेल्या दिसून आल्या. तेव्हा पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याने मी पोलिस आहे. माझ्यावर कारवाई करु नका, नाही तर तुम्हाला महाग जाईल, अशी धमकी दिली. त्याच्या बोलण्या -वागण्यावरुन व त्याच्या पेहरावावरुन तसेच त्याचे वाढलेले केस व दाढी यामुळे पोलिसांना तो पोलीस नसल्याचा संशय आला. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्याने सातारा पोलिसाचे ओळखपत्र दाखविले. त्यावर युनिफॉर्ममध्ये फोटो होता. ते ओळखपत्र पाहताच ते बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्याच्याकडे पदाबाबत व नेमणूकीबाबत प्रश्न विचारल्यावर तो गोंधळला. अधिक चौकशी केल्यावर त्याने मित्राचे पोलिस ओळखपत्र बघून त्या प्रकारचे डुप्लीकेट ओळखपत्र बनविल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांनी त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.