पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती शहर आणि परिसरात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि अनेकविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सायंकाळनंतर शहराच्या पूर्वभागातून विविध मंडळांनी काढलेल्या दिमाखदार मिरवणुका पाहण्यासाठी शिवप्रेमींची ठिकठिकाणी गर्दी होत होती. तिथीनुसार शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मंगळवारी मध्यरात्रीनंतरच दुचाकीस्वार तरुणांचे गट भगवे झेंडे फडकावित सिंहगडावर जाताना दिसत होते. शिवजयंतीसाठी मंडप घालून सजावट करण्याचीही धांदल सर्वत्र सुरूहोती. सकाळी चौका-चौकांतील मंडळांनी शिवप्रतिमेला किंवा अर्धपुतळ्याला, पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांची पूजा केली. शिवचरित्रातील प्रसंगांचे आकर्षक देखावे अनेक मंडळांनी सादर केले. पोवाडे आणि वीरश्रीयुक्त गाणी प्रसारित केली जात होती. भगवे ध्वज आणि पताकांनी परिसर सजविण्यात आले होते. शहरातील मुख्य मिरवणूक सायंकाळनंतर भवानीमाता मंदिराजवळून सुरू झाली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शिवचरित्रातील जिवंत देखावे बहुतेक मंडळांनी सादर केले. मिरवणुका पुढे जात असताना बँडवादन, ढोल-ताशांचा गजर केला जात होता. कसबा पेठेतील शिवशक्ती प्रतिष्ठानने शिवप्रतिमेची मिरवणूक काढून बालवारकऱ्यांच्या दिंडीचे भजन, कीर्तन आयोजित केले होते.महाराष्ट्र शाहीर परिषदेने सालाबादप्रमाणे शिवप्रतिमेची पालखीमधून मिरवणूक काढली. नाना पेठेतील देशप्रेमी मंडळ, नाना पेठ शिवसेना शाखा, हिंदवी क्रीडा प्रतिष्ठान, हिंदमाता प्रतिष्ठान, संयुक्त रविवार गणेश पेठ शिवजयंती उत्सव समिती आदी मंडळांच्या लक्षवेधी मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.
शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला
By admin | Published: March 16, 2017 2:10 AM