पुणे : कोविडच्या साथीच प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम आशा कार्यकर्त्यांनी केले. सुरक्षिततेच्या पुरेसा साधनांशिवाय, तुटपुंज्या मानधनावर त्यांनी आपली जबाबदारी पार पडली आहे. पुरेसे मानधन वेळेवर मिळावे म्हणून त्यांना संघर्ष करावा लागत आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लांच्छनास्पद आहे. आशा कार्यकर्त्यांच्या न्याय आणि रास्त मागण्यांना जन आरोग्य अभियानातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
राज्यभरातील सर्व आशा कार्यकर्त्यांना जगण्यासाठी किमान वेतन नियमितपणे मिळावे; कोरोनासंबंधित कामाच्या मोबदल्यात वाढ द्यावी; कोरोना संबंधित काम करण्यासाठी ३०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता देण्यात यावा;आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा आणि गट प्रवर्तक यांना प्राधान्य द्यावे, या त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आशा १५ जूनपासून करत आहेत. त्यांचा संप ही केवळ मानधनाची लढाई नाही तर हे एकूण आरोग्य व्यवस्थेच्या दुर्दशेचे एक लक्षणही आहे. हे समाजाने समजून त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे जनआरोग्य अभियानातर्फे नमूद करण्यात आले आहे.