पुणे : ‘देवानं मला आणखी पन्नास वर्षांचं आयुष्य दिलं तर त्यातली २५ वर्षं मी बाबासाहेबांना देईन,’ असं म्हणत रसिकांच्या आवडत्या आशाताई भोसले यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलचा स्नेह व्यक्त केला. ‘मागे उभा मंगेश, पुढा उभा मंगेश’ या गीताच्या ओळी आशाताईंनी त्यांच्या चिरतरुण स्वरात बाबासाहेबांसाठी सादर केल्या. बाबासाहेबांच्या मिश्कील स्वभावाचा किस्साही यावेळी आशाताईंनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘एकदा लतादीदीने बाबासाहेबांना विचारले की, कोणाचा आवाज तुम्हाला जास्त आवडतो?’ तेव्हा लता, आशा किंवा उषा यांच्यातल्या कोणाचंही नाव घेतलं तर अडचण होईल. म्हणून बाबासाहेबांनी ‘कपबश्यांचा’ असे उत्तर देत स्वत:ची सुटका करून घेतल्याचा प्रसंग सांगताना आशाताईंना या वयातही हसू आवरलं नाही.
निमित्त होते बाबासाहेबांच्या शतकी पदार्पणाचे. ‘जीवनगाणी’, ‘जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘स्वरगंधार’ या संस्थांनी पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी स्वत: नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.
‘सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती येथे आहे, ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे,” असा आदरभाव आशाताईंनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंड आणि नंदी आजही माझ्या घरात आहे. या पिंडीने माझे आयुष्य समृद्ध केले आहे. मी नेहमीच मोगऱ्याच्या फुलासारखे टवटवीत राहाण्याचा आणि मन स्वच्छ मन ठेवण्याचा प्रयत्न करते. बाबासाहेबांनी खूप भरभरून प्रेम दिले दिले....” या नंतर त्यांनी ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’ आणि ‘चंदनाची चोळी अंग अंग पोळी’ या अभंगांच्या ओळी गायल्या.
गजानन मेहेंदळे म्हणाले, “बाबासाहेब हे फक्त ‘शिवशाहीर’ नाहीत तर इतिहास संशोधक देखील आहेत. मात्र, त्यांची ‘संशोधक’ ही ओळख झाकोळली गेली आहे.” सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणाले, “शिवाजी महाराजांची गोडी मला वडिलांमुळे लागली. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम आणि कार्य मला नेहमीच भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावासा वाटते.” श्रीराम केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मंदार कर्णिक यांनी आभार मानले.