जुन्नर : शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव झालेला पराभव पक्षसंघटनेच्या जिव्हारी लागल्याने पक्षाने झाडाझडती सुरू केली आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके आणि जिल्हा प्रमुख राम गावडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदावरून दूर केल्याने बुचके यांना मानसिक धक्का बसल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब तसेच रक्तातील साखर वाढल्याने तातडीचे उपचार करावे लागले. त्यांची प्रकुती स्थिर असुन जुन्नरमधील रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी ,नेते कार्यकर्ते यांची गर्दी झाली होती. त्यांच्या समर्थकांनी आशाताई यांच्यावर अन्याय झाला अशी भावना व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार शरद सोनवणे शिवसेना शिवसेनेत प्रवेश करणार हे स्पष्ट झाल्यानंतर र् बुचके यांनी नारायणगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांना विरोध केला होता. त्यांचा विरोध झुगारून सोनवणे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा झालेला पराभव,कोणाचे नाव न घेता पक्षाच्या भूमिकेला बुचके यांनी केलेला विरोध, विधानसभा निवडणुकीत बुचके यांची संभाव्य भुमिका या सर्व पार्श्वभूमीवर बुचके यांच्या हकालपट्टीचा निर्णय झाल्याचे समजते. आढळराव यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षात झाडाझडतीची कारवाई सुरू झाली आहे. होती.आशाताई बुचके या 2002 पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या म्हणुन त्या कार्यरत होत्या. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. २००९ मध्ये शरद सोनवणे यांना दिलेले विधानसभेचे तिकीट पुन्हा आशाताई यांना देण्यात आले होते. या निवडणुकीत आशा बुचके यांना वल्लभ बेनके यांच्या विरोधात ६००० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. जिल्हा परिषद निवडणुका त्यांनी तालुक्यात विविध गटातून लढविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत जुन्नरमध्ये शिवसेना पक्षाला सर्वात मोठा फटका बसला होता. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना 42 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. बुचके यांच्या हकालपट्टीने शरद सोनवणे यांनी जुन्नरची विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, पंचायत समिती गटनेते दिलीप गांजाळे , जुन्नर शहर प्रमुख शिवदर्शन खत्री, गणेश कवडे,माजी नगरसेवक अविनाश करडीले, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे,माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ, संदीप ताजणे, माजी पंचायत समिती सभापती दशरथ पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज वाजगे,शैलेश गायकवाड तसेच शिवसैनिक कार्यकर्ते यांनी रुग्णालयात आशा बुचके यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.शिवाजीराव आढळराव यांना सुरूवातीपासून निष्ठेने साथ देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख (शिरूर) राम गावडे यांनाही पदावरून हटविले आहे. त्यांनी अनेक वर्षे जिल्हा प्रमुखपदी काम केले आहे. खेड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी गेल्या वेळी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सुरेश गोरे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली. गेली अनेक वर्षे आपण पक्षाचे निष्ठेने काम करीत आहोत. पक्षाने आजपर्यंत खूप दिले आहे. मात्र, पदावरून दूर करताना समक्ष बोलावून सांगायला पाहिजे होते, अशा शब्दांत गावडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. गावडे यांच्या जागी जिल्हाप्रमुखपदी माऊली कटके यांची नियुक्ती झाली आहे. आपल्या वाघोली मतदारसंघात आढळराव यांना मोठे मताधिक्य दिले होते.
शिवसेना पक्षाने घेतलेला निर्णय मला जिव्हारी लागला आहे. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिक आहे. आता जर बाळासाहेब असते तर माझ्यावर असा अन्याय कदापि झाला नसता. लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवाजीराव आढळराव यांना सर्व ठिकाणी नाकारले असुन त्या संदर्भात मला एकटीला दोष देण्याची आवश्यकता नाही. - आशा बुचके
़़़