Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 02:42 PM2018-07-23T14:42:41+5:302018-07-23T14:53:31+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या नाराजीला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. दिग्विजय सिंह गेल्या 27 वर्षांपासून दर आषाढीला पंढरपूरला दर्शनासाठी जातात. यंदाही दर्शन घेऊन त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः ज्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा सामना करत आहेत. या गोष्टीला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्या समाजांची नाराजी साहजिक आहे. अनेक वर्षांची परंपरा होती की मुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेला उपस्थित राहतात. यंदा मात्र भाजपचा कोणीही मंत्री नव्हता. एवढे का घाबरतात ते लोक असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
(Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे)
यावेळी त्यांनी अविश्वास ठरावावरही आपले मत मांडले. या ठरावावर भाषणे सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीवरही त्यांनी भाष्य केले. मिठी मारणे संसदेच्या परंपरेच्या विरोधात नाही.यापूर्वीही लोकप्रतिनिधी एकमेकांना भेटायचे. हातात हात घेत असत असेही त्यांनी सांगितले. लोकांना काही कारण नसताना अफवा पसरवून मारलं जात आहे मात्र लहान लहान मुद्यांवर ट्विट करणारे पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेना कायम त्यांच्यासोबत निवडणूक लढवत आली. मात्र नुकत्याच अविश्वास प्रस्तावात त्यांनी भाजपाला मदत केली नाही.त्यांनीही भाजपावर अविश्वास दाखवला असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांना 125 कोटी भारतीयांचे समर्थन आहे असे नाही. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली. या सरकारने 15 लाख कोटी रुपये खात्यात जमा केले तर नाहीच. काळा पैसा परत आणू असेही सांगितले. पण ते आणणे तर लांबच पण भारतीयांचा आहे तो पैसा ही बाहेर गेला. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल असा सरकारचा दावा होता. मात्र त्यालाही यश आले नाही. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्या त्यांचा पंतप्रधान झाल्यावर पूर्ण स्वीकार केला. भाजपा हिंदूंमध्ये धर्मांधता पसरवत आहे तर ओवैसी मुस्लिम समाजात धर्मांधता पसरवत आहेत असेही भाष्य त्यांनी केले.