पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. विशेषकरून पालखीमध्ये होणाऱ्या चोऱ्या आणि बाकीच्या घटना रोखण्यासाठी जे आरोपी आहेत, त्यांचे मोठे फोटो चौकामध्ये पालखी मार्गावरती पालखी होर्डिंग उभारून पोलिसांनी लावले होते. वारकरी देहूमध्ये येताना हे फोटो पाहून खबरदारी घेत होते.
तसेच मंदिर व बाहेरील परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. देहूगावात येणाऱ्या वाहनांना पोलिसांनी आधीच बंदी घातली होती. या मार्गावरून ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत वारकरी येत होते. पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच ठिकठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी दक्षता घेत बॅरिकेड्स उभे केले होते. चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सराईत झळकले होर्डिंगवर
पालखी सोहळ्यात चोरीच्या घटना टाळण्यासाठी सराईत चोरट्यांचे फोटो पालखी मार्गावर लावले होते. हे फोटो पाहून चोरटे आपल्या आसपास नाहीत ना? याची काळजी वारकऱ्यांना घेता येणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे वारकरी स्वागत करत होते.
वारकऱ्यांसाठी अन्नदान
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शुक्रवारपासूनच दिंड्यांचे आगमन होत होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध संघटनांकडून मोफत अन्नदान करण्यात येत होते.
औरंगाबाद, नागपूरचे पोलिस देहूत
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. मंदिर परिसरात पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांसोबत नागपूर, औरंगाबाद येथील लोहमार्ग पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते.