पुणे : पालखीत सहभागी एखाद्या वारकऱ्याला तातडीने दवाखान्यात दाखल करायची गरज पडल्यास चारचाकी रुग्णवाहिकेला मर्यादा येतात. हे लक्षात घेत आराेग्य विभाग यंदा पालखीसाेबत चारचाकीसह दुचाकी रुग्णवाहिका तैनात करणार आहे.
दाेन्ही पालख्यांमध्ये मिळून १५ लाख वारकरी सहभागी हाेतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत अशा प्रकारे सुमारे १०० आरोग्यदूतांची नेमणूक केली आहे. त्यांना विशेष ओळखपत्र, पोशाख दिला जाणार आहे.
पालखी मार्गावर तात्पुरते तंबू, फिरते वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. दिंडी मार्गावरील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्री कार्यान्वित केली आहे. यासाठी १६० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
प्रत्येक रुग्णालय तसेच तंबूमध्ये हिरकणी कक्ष लावण्यात येणार आहे. शासकीय रुग्णवाहिका सुविधा, तसेच स्नायूंच्या दुखण्यांसाठी भौतिकोपचार आणि योगोपचार सेवा देण्यात येणार आहेत. साेबत फिरत्या दवाखान्यांची सोय करण्यात आली आहे.