पुणे : आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी हवामानशास्त्र विभागाकडून खास पावसाची माहिती देण्यासाठी सुविधा सुरू केली आहे. विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पेज सुरू केले असून, त्यावर पुढील चोवीस तासांमधील अंदाज अगोदरच कळणार आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या वेळी पाऊस पडेल, त्याची माहिती वारकऱ्यांना समजल्यानंतर ते त्यापासून बचाव करू शकतील, या सेवेची सुविधा भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि.१०) आज प्रस्थान ठेवत आहे, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि.११) प्रस्थान ठेवेल. या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना पावसाचा अंदाज कळावा, यासाठी हवामानशास्त्र विभागाने ही सुविधा सुरू केली आहे. त्यामध्ये दिवसभरात कोणत्या वेळेत पाऊस पडेल, याची माहिती तीन तास अगोदर समजेल.
यंदा मॉन्सून उशीरा आल्याने महाराष्ट्रातही तो उशीरा येणार आहे. दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात येताना पाऊस येतो. यंदा मात्र दुपारचे तापमान प्रचंड वाढत असल्याने सायंकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस दुपारी आकाश निरभ्र आणि सायंकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. देहू व आळंदी येथून पंढरपूरचे अंतर जवळपास २५० किलोमीटर आहे. पाऊस सक्रिय होईपर्यंत वारीचा अर्धा रस्ता पूर्ण झालेला असेल. पण गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, झाडाखाली विश्रांती घ्यावी, अशा सूचना हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी केल्या आहेत.
हवामानशास्त्र विभागाने खास आषाढी वारीमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठीचे मॉडेल गेल्या वर्षी विकसित केले. यामध्ये वारीच्या मार्गावरील हवामानाचा अंदाज २४ तास अगोदर देण्यात येणार आहे. यंदा या सुविधेचा सर्वांना फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ही सुविधा १० जूनपासून म्हणजे आजपासून सुरू झाली आहे.