इंदापूर (पुणे) : इंदापूर नगरीतील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पुढे मार्गस्थ झाला. इंदापूरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथून लाखो वैष्णवांसह टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानबा-तुकारामच्या जयघोषात या पालखी सोहळ्याचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले.
पालखी बस स्थानक, खडकपुरा, मुख्य बाजार पेठ, नेहरू चौक, साठे नगर, आंबेडकर नगर, जोतीबाचा माळ मार्गे अकलुज रस्त्याने सराटी या गावी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. सोमवारी संध्याकाळी तुकाराम महाराज पालखीचा पूणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आहे. तर मंगळवारी सकाळी पालखी सराटी मुक्काम उरकून नीरा नदीत स्नान करून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून अकलुज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचे तिसरे गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे.
इंदापूर येथून पालखी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळा व वैष्णवांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह बावडा गावी दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी सव्वा चारच्या समारास पालखी सराटी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. यादरम्यान वरूणराजाने हजेरी लावल्याने लाखो वैष्णवांच्या चेहर्यावर आनंदाच्या छटा दिसून आल्या.