पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागातून यंदा आषाढी यात्रेसाठी २८० हून अधिक एसटी बस सोडण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातर्फे यंदा गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात. अनेक भाविक स्वत:च्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने जातात. एसटी महामंडळाकडून दरवर्षी आषाढी वारीनिमित्त जादा बस सोडण्यात येतात. यंदाही पुणे विभागातील विविध आगारातून २८० हून अधिक बस सोडण्यात येणार आहेत. वारीकाळात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
गाव ते पंढरपूर एसटी सेवा
राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाइन बुकिंग सेवा उपलब्ध
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना एसटीचे ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. भाविकांना महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आरक्षण करता येणार आहे.
राज्यभरातून एसटीच्या पाच हजार बस सुटणार
आषाढी यात्रेनिमित्त विठूनामाचा जयघोष करीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्याच्या विविध आगारातून या बस सोडण्यात येणार आहेत.
आषाढीवारीनिमित्त पुणे विभागातून गेल्यावर्षी २७५ बस सोडल्या होत्या. या बसच्या साधारण ४५० फेऱ्या झाल्या होत्या. यंदाही पुणे विभागातून २७५ पेक्षा जादा बस सोडण्यात येणार आहे.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग