बावडा (पुणे) : जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना पुणे जिल्ह्यातील शेवटचा इंदापूर तालुक्यातील सराटी या गावातील मुक्काम आटोपल्यानंतर नीरा नदीच्या किनाऱ्यावर यावर्षी सिमेंटचा घाट बांधण्यात आला. या घाटावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून नयनरम्य पद्धतीने सजावट करण्यात आली होती.
अशा या निरा नदीच्या घाटामध्ये हरिनामाचा जयघोष करीत ज्ञानोबा... माऊली... तुकाराम... व टाळ मृदंगाच्या निनादात सराटी येथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना चंदन अत्तरचा लेप देत पालखी सोहळ्यातील प्रमुख विश्वस्तांच्या उपस्थितीत स्नान घातले. हा नयनरम्य सोहळा पूलाच्या दोन्ही बाजूने उभा राहून हजारो भाविक निरास्नानाचा दैदीप्यमान सोहळा पार पडत असताना पहात असल्याचे निदर्शनास आले.
यावर्षी पावसाने हजेरी न लावल्यामुळे निरा नदीला पाणी येऊ शकले नाही म्हणून प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणी निरा नदीच्या पात्रात सोडून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आले.त्यानंतर पादुका पालखी तळावरती आणण्यात आली. यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी विश्वस्तांच्या वतीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पोलीस निरीक्षक दिलीप पवार, गटशिक्षणाधिकारी खरात,उप पोलीस निरीक्षक नागेश पाटील ,उप पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, आधी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच संतोष कोकाटे, हनुमंत कोकाटे, अमर जगदाळे, बाप्पू कोकाटे, राजेंद्र कुरळे, मनोज जगदाळे, बाबासाहेब कोकाटे, काकासाहेब जगदाळे, लालासाहेब काटे, अण्णा कोकाटे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, ग्रामसेवक साळुंखे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पालखीने नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. या पालखी बरोबर पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी पालखी सोलापूर जिल्ह्यात पोच केली. तेथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व इतर मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.