- बी. एम. काळे
जेजुरी (पुणे) : श्री. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज सकाळी तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीचा निरोप घेत सकाळी ६ वा. महर्षी वाल्मीकीच्या वाल्हेकडे प्रस्थान ठेवले. आज पहाटे जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा सौ. वीणा सोनवणे यांच्या हस्ते माऊलींची अभिषेक आरती करण्यात आली. यावेळी जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले उपस्थित होते. महापूजा आरती नंतर सोहळ्याने सहा वाजता वाल्हे गावाकडे कूच केले.
ग्यानबा तुकाराम च्या गजरात माऊलींचा सोहळा सकाळी ८ वाजता जेजुरी कोळविहिरे आणि दौडज गावांच्या शिवेवर असणाऱ्या भोरवाडीनजीक दौडज खिंडीत न्याहारीसाठी विसावला. यावेळी कोळविहिरे पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी, तसेच भोरवाडीतील प्रत्येक घरातून भाजी आणि पाच भाकऱ्या एकत्र करून पिठलं भाकरी, कांदा चटणीचे दिंडीतून वाटप करण्यात येत होते. तसेच विविध संस्था संघटनांनी माऊलींच्या सोहळ्यातील वैष्णवांना न्याहारीची सुविधा पुरवली होती. माजी सरपंच बापू भोर मित्र मंडळाच्या वतीने पोहे, बिस्कीट वाटप, करण्यात आले. तर कोळविहिरे ग्रामपंचायतीकडून वारकऱ्यांना पोहे वाटप करन्यात येत होते.
न्याहारीसाठी ठिकठिकाणी वैष्णव बसले होते. न्याहारीवर ताव मारताना मेळ्यातून श्री संत सावतामाळी यांच्या ओव्या ऐकू येत होत्या.कांदा-मुळा-भाजी ।अवघीं विठाई माझी ।।
लसुण-मिरची-कोथिंबिरी ।अवघा झाला माझा हरीं ॥
ऊस-गाजर-रातळू ।अवघा झालासें गोपाळू ॥
मोट-नाडा-विहींर-दोरी ।अवघीं व्यापिली पंढरी ।।
सावता म्हणें केला मळा ।विठ्ठल पायीं गोविंला गळा ।।
तासाभराचा न्याहारीचा विसावा घेतल्यानंतर सोहळ्याने दौडजकडे प्रस्थान ठेवले. दुपारी दौडज येथील दुपारची विश्रांती घेऊन सोहळा वाल्हे मुक्कामी पोहोचेल.