बारामती (पुणे): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
बारामती येथे कार्यक्रमानिमित्त महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शनिवारी (दि. २४) आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली याशिवाय व्हीआयपींच्या गदीर्मुळे वारकऱ्यांना दर्शन घेता येत नव्हते, मंदिर परिसरात एलईडी लावून वारकऱ्यांना शासकीय महापूजा पाहता येणार आहे. त्यामुळे भाविकांना अडचण होणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या व्हीआयपींना दर्शन दिले जाईल मात्र इतर व्हीआयपीचे दर्शन त्या दिवसात बंद राहील असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.