- संदीप धुमाळ
वरवंड (पुणे) : वरवंडमध्ये ग्रामस्थांनी यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी स्वागतासाठी स्वागत कमानी, घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पालखी नवीन विठ्ठल मंदिर परिसरात ५.४५ वाजता पोहोचल्यानंतर विठ्ठल नामाच्या जयघोषात रिंगण पूर्ण केले. विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, भगवे झेंडे घेतलेल्या वारकऱ्यांनी मंदिराला रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेऊन मंदिरामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर आरती व नैवेद्य दाखविल्यानंतर विणेकरी यांनी दर्शन घेतल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. दर्शन रांगेत महिला व पुरुषांनी स्वतंत्र रांगा केल्या होत्या. मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
वारकऱ्यांच्या जेवणाची सोय ग्रामस्थांनी वस्तिगृहाच्या मैदानात केली होती. तसेच रामदास नाना मित्रमंडळ, श्री गोपीनाथ रोडलाइन्स व सातपुते डेव्हलपर्स मित्र परिवार तसेच सुमन नारायण उद्योग समूह व राहुलदादा मित्र परिवार यांच्यावतीने चहा, नाष्टा, पोहे, बेसन भाकरी, आमटी, भात अशी जेवणाची सोय करण्यात आली होती. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नवीन विठ्ठल मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या सोहळ्यात स्वच्छतेचे संदेश, निर्मल वारी, निर्मल ग्राम, शेतकरी वाचवा, झाडे लावा, झाडे वाचवा असे फलक लावण्यात आले होते. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने मंदिर परिसरात आरोग्य तपासणी केंद्र ठेवण्यात आले होते. तसेच प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी आमटी, भात, लापशी ठेवली होती.