- बी.एम.काळे
जेजुरी (पुणे): "पंढरीत आहे रखुमाई, येथे म्हाळसा बानाई ।तेथे विटेवरी उभा, ईथे घोड्यावरी शोभा ।तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान । तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे । तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा । तेथे मृदंग वीणा टाळ, इथे वाघ्या मुरुळीचा घोळ ।" अशा लोकप्रिय ओव्या गात आणि टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा सायंकाळी ५ वाजता जेजुरीत दाखल झाला. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भांडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे जेजुरीत स्वागत करण्यात आले. ६ वाजता समाज आरतीने दमला भागला वैष्णव सोहळा जेजुरीत शिव चरणी विसावला.
आज सकाळी श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन माऊलींच्या सोहळ्याने कुलदैवत खंडेरायाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी सकाळी संपूर्ण ढगांनी आच्छादलेले आकाश वातावरण आल्हाददायक बनवत होते. मात्र जसजसा सूर्यदेव वरवर येऊ लागला तसतसा उन्हाचा तडाखा सुरू झाला. अधुनमधून एखादं दुसरा ढग सोहळ्यावर सावली धरू पाहत होताच. ऊन सावलीचा खेळ, आणि रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता सोहळा जेजुरीकडे मार्गक्रमण करीत होता.
माऊलींच्या रथापुढील आणि मागील दिंड्या दिंड्यातून येणारे अभंग, भूपाळ्या, गौळणी, आंधळे पांगळे गुरुपरंपरेचे अभंग, वासुदेव, नाटाचे अभंग आदींच्या मंगलमय सुरांनी संपूर्ण वातावरण चैतन्य आणि उत्साहाने भरून गेले होते. डोक्यावर रणरणत्या सुर्य किरणांची दाहकता या वातावरणाने संपूर्ण नष्टच करून टाकली होती. याच सुर ताल आणि उत्साही वातावरणात सोहळ्यातील अवघा वैष्णव मेळा झप झप पावले टाकीत मल्हारी मार्तंडांची जेजुरी जवळ करीत होता.
ग्यानबा तुकारामच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरावके मळा येथील न्याहारी आणि शिवरी येथील विश्रांती त्याच बरोबर साकुर्डे फाटा येथील अल्प विश्रांती उरकून सोहळ्याने मजल दरमजल करीत सायंकाळी ५ वाजता तीर्थक्षेत्र जेजुरी जवळ केली. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगराध्यक्षा सौ. वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, रोहिदास कुंभार, सुशील राऊत, माजी नगरसेविका रुख्मिनी जगताप आदिंनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी माऊलींच्या पालखीवर भांडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आली.
मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, डॉ.राजेंद्र खेडेकर, विश्वास पानसे, पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माऊलींचे स्वागत केले. दररोजच्या अबीर बुक्क्यात न्हाऊन निघणारा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामी पिवळ्याजर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला. नव्याने निर्माण करण्यात येत असणाऱ्या जेजुरीच्या पश्चिमेला अहिल्यादेवी होळकर तलावाकाठी मुक्काम तळावर सोहळा शिव विष्णूच्या गजरात पोहोचला. सायंकाळी ६ वाजता समाज आरतीने सोहळा शिव चरणी विसावला. उद्या सकाळी ६ वाजता सोहळा वाल्हेकडे प्रस्थान ठेवणार असल्याचे चोपदारांनी सांगितले.
आज दिवसभर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील भाविक जेजुरीत येत होते. विष्णू अवतार पंढरीनाथाला भेटायला निघालेला वैष्णव शिव अवतार मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन कुलदैवताची वारी पूर्ण करीत होता. आज दिवसभर जेजुरी गडावर ही भाविकांची मोठी गर्दी होती. वृद्ध वारकरी भाविकांसाठी मार्तंड देव संस्थानकडून पालखी मार्गावरील मुख्य शिवाजी चौकात मोठ्या स्क्रीन वर गडातील मुख्य गाभाऱ्याचे थेट प्रक्षेपण करून दर्शनाची सोय केली होती. त्याच बरोबर देवाच्या प्रसाद वाटप ही करण्यात येत होते. सासवड ते जेजुरी दरम्यान वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी वारकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात येत होते. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून माऊली भक्तांना आरोग्य सुविधा ही पुरवण्यात येत होत्या. व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने वारकऱ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत होते तर स्थानिक विविध राजकीय पक्ष कार्यकर्त्या कडून वारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात येत होते.