पुणे : पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थानांच्या तसेच दिंड्यांच्या प्रमुखांनी विविध समस्याची सरबत्ती गुरुवारी (दि. २५) झालेल्या आढावा बैठकीत केल्यानंतर या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यातील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी सर्वच संस्थानांनी पालखी सोहळ्यादरम्यान येत असलेल्या समस्यांची उजळणी केली. त्यात प्रामुख्याने पालखीतळाच्या जागेबाबत सर्वच संस्थानांच्या प्रमुखांनी तक्रारी केल्या त्यावर पाटील यांनी यासंदर्भात दर आठवड्याला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संस्थांचे प्रमुख तसेच प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती दर आठवड्याला आढावा घेऊन पालखी सोहळ्यात येणाऱ्या समस्यांच्या संदर्भात उपायोजना करणार आहे. पाण्याचे टँकर, शौचालयांची व्यवस्था रस्त्याने चालताना मंडपांची व्यवस्था झाडांची व्यवस्था अशा अनेक समस्या यावेळी संस्थानांच्या प्रमुखांनी मांडल्या. त्यावर पाटील यांनी या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले.
देहूचे गायरान वारकऱ्यांसाठी
यावेळी देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले देहू मध्ये सोहळा सुरू असताना वारकऱ्यांना थांबण्याची सोय नाही या ठिकाणी एक गायरान आहे. त्याची जागा ३५ एकरांवर पसरलेली आहे. हे गायरान पूर्ण वेळ संस्थानांचा संस्थांचा वारकऱ्यांसाठी आरक्षित करावे जेणेकरून देहूत वर्षभर येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होईल. याबाबत पाटील यांनी यंदाच्या वर्षात ही समस्या येणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच या गायरानावर अनेक सrकारी संस्थांसह इतर स्वयंसेवी संस्थांनीही दावा केलेला आहे. त्याबाबत पालखी सोहळ्यानंतर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी पाटील यांनी मोरे यांना दिले.
सोपान महाराज पालखी सोहळ्याला सुविधा देऊ
सोपान महाराज संस्थानांच्या पालखी सोहळ्यात यंदा केवळ दोन टँकर देण्यात आले आहे. तसेच शौचालयांची संख्या देखील अतिशय तुटपुंजी आहे. ज्या रस्त्यावरून पालखी सोहळा जातो, त्यात अनेक खड्डे आहेत. त्यामुळे रथाला हाकताना अडचणी येत आहेत अशी तक्रार संस्थांचे प्रमुख यांनी मांडली. त्यावर विभागीय आयुक्तांनी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी ही समस्या तातडीने दूर कर, असे आश्वासन दिले.
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार
मुक्ताईनगर येथील मुक्ताई संस्थांच्या पालखी सोहळ्यातही पाण्याच्या टँकर संदर्भात तेथील संस्थान प्रमुखांनी तक्रार केली. त्यावरही यासंदर्भात जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ही समस्या सोडवू, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
मोफत पास द्या
पंढरपूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर टोल सुरू करण्याचे नियोजन पुढील महिन्यात अर्थात जूनमध्ये होणार आहे. याबाबत सर्व संस्थान प्रमुखांनी हा टोल जूनऐवजी जुलैमध्ये सुरू करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यावर एन एच ए आय प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले की, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केल्यास हा टोल जुलैमध्ये सुरू करता येईल. मात्र पाटील यांनी तातडीने यावर हस्तक्षेप करत हा टोल जूनमध्ये सुरू झाला तरी वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना मोफत पास देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रकल्प संचालकांना दिले. तसेच आज नितीन गडकरी पुण्यातच आहेत हा विषय त्यांच्याशी बोलून मार्गी लावू, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यभर टोल मध्ये सूट द्या
ज्याप्रमाणे गणपती उत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई ते कोकण या मार्गावरील सर्व टोल नाक्यांवर माफी दिली जाते. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या वाहनांसाठी सर्वच ठिकाणी टोल माफी द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळेस आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी पाटील यांच्याकडे केली. दोन्ही पालखी मार्गांचे रुंदीकरण झाल्याने अनेक ठिकाणी विसावा तसेच पालखीतळाची जागा अरुंद झाली आहे. काही ठिकाणी ती नष्ट ही झाली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या शेजारील शेतकऱ्यांची जमीन ही रुंदीकरणात गेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना तसेच संस्थानांना नियोजन करण्यात अडचणी येत आहे. याबाबतही लक्ष घालण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
पालखी मार्गावर मंडप उभारा
यंदा अधिक महिना असल्याने उष्णतेचे प्रमाण जास्त असणार आहे त्यामुळे पालखी सोहळ्यात उष्माघाताचे प्रकार वाढू शकतात, अशी शंका सर्वच प्रमुखांनी व्यक्त केली त्यात आळंदीचे संस्थापक विकास ढगे पाटील यांनी सबंध पालखी मार्गाच्या मधोमध काही अंतरावर मंडप उभारण्याची सूचना केली. या मंडपामध्ये पाण्याची तसेच विसाव्याची सोय करावी अशी सूचना त्यांनी केली यावरही पाटील यांनी आश्वासन देत ही सूचना मान्य करू, असे सांगितले.