यवत : दौंड , पुरंदर व हवेली तालुक्यांच्या वेशीवर असलेल्या डाळींब (बन) येथील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची महापूजा स्थानिक मानकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
दर वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी डाळींब (बन) विठ्ठल मंदीरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या वर्षी व यंदा कोरोना आजाराच्या साथीमुळे येथील यात्रा रद्द करण्यात आली मात्र साधेपणाने धार्मिक विधी पूजा-अर्चा पार पडले.
श्री विठ्ठलाची महापूजा देवस्थनचे विश्वस्त दत्तू सोपाना म्हस्के यांचे नातू सौरभ धनंजय म्हस्के व त्यांच्या पत्नी क्रांती सौरभ म्हस्के यांच्या हस्ते झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के, सचिव लक्ष्मण म्हस्के, व्यवस्थापक अरूण म्हस्के सर्व विश्वस्त तसेच पंचायत समिती सदस्य सुशांत दरेकर , डाळींबचे सरपंच वनिता धिवार, उपसरपंच पूनम म्हस्के, किसन म्हस्के, हवेली पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, महादेव कांचन, बजरंग म्हस्के, उरुळी कांचनच्या सरपंच संचिता संतोष कांचन, पुजारी ऋषिकेश भाले, बोरीभडक ग्रामपंचायत सदस्य अमोल म्हेत्रे, अनिल धिवार उपस्थित होते.
मंदीरात विठ्ठलाच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यानंतर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मंदिर परिसरात तुरळक गर्दी केली होती.
लवकरच कोरोनाच्या साथीमधून सुटका होऊ दे अशी प्रार्थना विठूरायाला ग्रामस्थांनी केली.
दिवसभर मंदीरात विविध भजनी मंडळांनी मंदीरात भजन केले. मागील वर्षी कोरोनाच्या साथीमुळे आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण मंदीर परिसर सुनासुना होता. यंदा मात्र सकाळ पासून स्थानिक नागरीक मंदिराच्या बाहेरून दर्शन घेण्यासाठी येत होते. दिवसभर आजूबाजूच्या गावातील भजनी मंडळांनी हजेरी लावली होती. दिवसभर मंदीरात भजने सुरू असल्याने भक्तिमय वातावरण जाणवत होते.
-
फोटो क्रमांक : २०यवत डाळींब विठ्ठल मंदिर
फोटो ओळ क्रमांक १ :- श्री.क्षेत्र डाळींब (बन) विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीची महापूजा केल्यानंतर दिसणारे मनोभावे रूप