भानुदास पऱ्हाड
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आळंदी - भोसरी - पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी (चऱ्होली बुद्रूक) हद्दीतील साई मंदिरासमोर उंच माथ्यावर थोरल्या पादुका मंदिर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात घेत असते. त्यामुळे या मंदिराविषयी वारकऱ्यांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. सद्य:स्थितीत लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे.
माउलींसह चारही भावंडे याच ठिकाणी न्याहारी आणि विसावा घेत असे. या परिसरात त्यांचे येणे-जाणे असल्याचे अनेक पुस्तकांमधून संदर्भ आढळतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या मावशीचे गाव चऱ्होली होते. मावशीचे आडनाव कुलकर्णी असल्याचेदेखील ऐकिवात आहे. त्यामुळे माऊलींचा वावर पंचक्रोशीत असे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर सकाळचा विसावा याच थोरल्या पादुका मंदिरात घेत असते. पालखीबरोबर मार्गस्थ झालेले लाखो वारकरीदेखील मंदिराभोवती विसावतात. माउलींच्या पादुका मंदिरात आणल्या जातात. या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर व सुनीता तापकीर यांच्या हस्ते पादुकांवर अभिषेक व महापूजा केली जाते. श्रींना पेढे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर माउलींची व पांडुरंगाची आरती होते. थोरल्या पादुका मंदिराच्या ठिकाणी पूर्वी मोकळी जागा होती. गर्द झाडी, फुलांच्या बागा होत्या. व माऊलींच्या पादुकांचे छोटे मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर अशी छोटीछोटी मंदिरे होती. सदरील जागा ही खासगी मालकीची असल्याने या ठिकाणी अधिकृत अशी ट्रस्ट, संस्था नव्हती. त्यामुळे गेली अनेक वर्षे या भागाचा विकास होत नव्हता. परंतु, ॲड. विष्णू तापकीर यांनी या जागेचे मालक गोखलेमळा येथील मुकुंदराव गोखले यांच्याशी सतत संपर्क साधून सदरील मंदिराचा ट्रस्ट सन १९९८ साली स्थापन केला. त्यानंतर काही दिवसांनी या जागेमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सदरील थोरल्या पादुका मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे.
या मंदिरात माउलींची साडेचार फूट उंचीची मूर्ती व विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. बांधकाम खर्च हा वारकरी, भाविक, नागरिक यांच्या देणगीतून व वस्तुरूपाने मिळालेल्या देणगीतून केलेले आहे. आजही पंढरपूरला मार्गस्थ होणाऱ्या दिंड्या या थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन माउलींची आरती घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होत असतात. पंढरपूरवरून कार्तिकी वारीला आलेली पांडुरंगाची पालखीदेखील परतीच्या वेळी थोरल्या पादुका मंदिरात विसावत असते.