पुणे : फलटण तालुक्यात (जि. सातारा) एक महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘माझी आई काळूबाई’ मालिकेच्या चित्रीकरणातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातील काही जण बरे झाले असले तरी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.
'माझी आई काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण फलटणमध्ये सुरू होते. मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचं शुटिंग करण्यासाठी सुमारे २० ते २२ लोक फलटण येथे गेले होते. मुंबईसारख्या कोरोना हॉट स्पॉट भागातून ही मंडळी आल्याने इतर कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही समावेश आहे. त्यांना १६ सप्टेंबर रोजी वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांची प्रकृतीचिंताजनक आहे. अभिनेत्री अलका कुबल या मालिकेत ‘काळूबाई’ ची मुख्य भूमिका साकारत असून, मालिकेच्या त्या निर्मात्याही आहेत.
याविषयी अधिक माहिती अलका कुबल यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, शासनाचा नियमच आहे की कलाकारांची टेस्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना सेटवर येण्याची परवानगी देण्यात यावी. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी आम्ही सर्व कलाकारांची कोरोना टेस्ट केली होती. त्यामध्ये सर्वांसह आशालता वाबगावकर यांचीही टेस्ट निगेटिव्ह आली होती. कलाकारांचा विमा उतरवण्यापासून ते दररोज शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी चेक करणे आणि सेट सँनिटाईज करणे या सर्व गोष्टी नियमानुसार केल्या जात होत्या. मात्र हे कसे घडले माहिती नाही. आम्ही बाहेरच्या लोकांना चित्रीकरणाच्या ठिकाणी येण्याची परवानगीही दिली नव्हती. पण आऊटडोअर गेल्यानंतर युनिटमधून कोण कुठून येतं ते कळत नाही. त्यामुळे कुणाला कुठूनही याची लागण होऊ शकते. काही कलाकार कोरोनामधून बरे झाले आहेत. परंतु वयोमानामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आलेले नाही. केवळ ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मात्र वयोमानामुळे काही सांगू शकत नाही.--------------------------------------------------------------------------------------------