पिंपरी : आशातार्इंच्या नावाचा पुरस्कार मला मिळणे ही आनंददायी बाब असून पुरस्कार माझासाठी खुपच महत्त्वाचा आहे, ऐंशीच्या दशकात आशाजींमुळे गायन क्षेत्रात पुढे आलो, त्यांनी मला आई सारखे प्रेम दिले, घडविले. त्यांनी माझ्यात आत्मविश्वास भरला. त्यामुळे आज मी अधिक भक्कम झालो, अशी हृद्य आठवण ज्येष्ठ गायक हरिहरन यांनी गुरूवारी चिंचवड येथे सांगितली.अ.भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड, कलारंग प्रतिष्ठान, सिद्धीविनायक ग्रुपच्या वतीने लक्षणीय संगीतकारास दिल्या जाणाऱ्या आशा भोसले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर शंकुतला धराडे, माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या हस्ते संगीतकार व ज्येष्ठ गायक हरिहरन यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ असे स्वरूप होते. निवड समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर, ललिता हरिहरन, संत साहित्याचे गाढे अभ्यासक रामचंद्र देखणे, आमदार लक्ष्मण जगताप, संयोजक भाऊसाहेब भोईर, निवड समिती सदस्य राजेशकुमार सांकला, हेमेंद्र शहा, आयुक्त राजीव जाधव, माजी महापौर आझम पानसरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, विनोद नढे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, ‘‘नव्या पिढीचे कलाकार व त्याचे चित्रपट, गायन, संगीत येते आणि जाते. पण हरिहरन यांच्यासारखे जुने गायक, संगीतकारांची गाणी रोजच्या धकाधकीच्या जिवनात सुखद आनंद देतात. सत्तेत असताना अर्थसंकल्पात कला व कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या अर्थसंकल्पात नाट्यसंकुलासाठी तरतूद केली जाईल.’’मंगेशकर म्हणाले, पुरस्काराच्या रूपाने शहरात कला जपण्याचे काम होत आहे. हरिहरन हे गुणी कलावंत आहेत. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांचा यशाचा चढता प्रवास आणखी पुढे जावो. ’’ राजेशकुमार सांकला यांनी आभार मानले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
आशातार्इंनी आईसारखे प्रेम दिले
By admin | Published: January 30, 2015 3:41 AM