केडगाव : अमेरिकेतील डालास शहरातील एकता टेम्पल मधील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्येआषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचा गजर रंगला. महाराष्ट्रातील अनिवासी ५०० पेक्षा जास्त निवासी नागरिकांनी १९९२ साली डालास शहरामध्ये अमेरिकेतील एकमेव सर्व हिंदू देवता असणारे मंदिर बांधले आहे. शहरातील अनिवासी भारतीय लोकांनी डी.एफ.डब्लु हिंदु एकता टेम्पल मध्ये विठ्ठल रुक्माई मंदिराबरोबरच गणपती, विष्णू ,राम ,कृष्ण ,शिव ,बालाजी आदी मंदिरे एकाच ठिकाणी उभारली आहेत. अंदाजे पाच एकर क्षेत्रामध्ये वीस हजार स्क्वेअर फुटचे बांधकाम या मंदिराचे आहे. या मंदिरामध्ये अनिवासी भारतीयांसाठी संस्कार वर्ग, सर्व भाषा शिकवणे आदी उपक्रम वर्षभर राबवले जातात.
आषाढी एकादशी निमित्त या मंदिरात शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन डालास फोर्ट वर्थ मंदीर या संघटनेने केले होते. आषाढी एकादशीनिमित्त सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाईचा अभिषेक झाला. त्यानंतर १० वाजता पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मजा जोगळेकर यांचा अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी विठ्ठल नामाची शाळा भरली, पंढरीच्या वाटेवरी आहे मी डौलत, पांडुरंगा करू प्रथम नमन यांच्यासह अनेक अभंग गवळणींनी परिसर भक्तीमय झाला होता. त्यानंतर विठ्ठल रखुमाईची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी ढोल ताशाचा गजर करण्यात आला.
सर्व भाविकांच्या साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांग लावली होती. यासंदर्भात मूळचे पुणे येथील सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले शाम बोठे म्हणाले की, दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हा आमच्यासाठी आनंददायी क्षण होता. गेल्या दोन वर्षांपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी सादर करता आली नव्हती. त्यामानाने यावर्षी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह होता. सर्वांनी आषाढी एकादशीनिमित्त उपवास केला. साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे भाग्य आम्हाला लाभले. यावेळी माधुरी बोठे, मोहन मोहळकर, रुपाली मोहळकर, अतुल पाटील, अपेक्षा पाटील ,संदीप सावरगावकर, तृप्ती सावरगावकर आदी अनिवासी भारतीय नागरिक उपस्थित होते.