पुणे : येरवडा येथील खुल्या कारागृहातून पळ काढलेला कैदी आशिष भरत जाधव हा स्वतः बुधवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास कारागृहात परतला. त्याचे आई-वडील त्याला घेऊन आले होते. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी आशिष याने पलायन केले होते.
आशिष जाधव याला खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याला १६ ऑगस्ट २०२२ पासून खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याच्याकडे रेशन गोदामाचे काम दिले होते. सोमवारी त्याने खुल्या कारागृहातून पलायन केले होते. आशिष जाधव यांचा शोध घेण्यासाठीची येरवडा पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. यावेळी आशिष जाधवच्या आईला ह्दयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. जाधव याने आईच्या काळजीपोटी कारागृहातून पलायन केले होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आशिष जाधव यांच्या आई वडिलांनी त्याला कारागृहात हजर केले. त्यावेळी आशिष जाधव आणि त्याच्या आई वडिलांना प्रतिक्षालयात थांबवण्यात आले. यानंतर याची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. येरवडा पोलिसांनी पलायन करणाऱ्या आशिष जाधव याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.