पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पुणेकरांचीही भारतीय जनता पार्टीने फसवणूकच केली आहे. असे ते म्हणाले.निवडणूक जाहीर होण्याआधीच काँग्रेसच्या वतीने राज्यात ५० सभा घेण्यात येणार असून त्यातील पहिली सभा शुक्रवारी सायंकाळी पुण्यात झाली. भवानी पेठेत झालेल्या या सभेला माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे तसेच पक्षाचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.उन्हाळ्याच्या आधीच पुण्यात पाणीटंचाई सुरू झाली, अशी टीका करून चव्हाण म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांनी नियोजन केले नाही; त्यामुळे पाणी कमी झाले व त्यांच्याच म्हणजे भाजपाच्या खासदारावर उपोषणाला बसण्याची वेळ आली होती. हेल्मेट सक्तीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत; मात्र त्यावर पालकमंत्री आणि आमदार, खासदारही बोलत नाहीत. भाजपाच्या सर्वांनीच पुणेकरांना वारेमाप आश्वासने दिली; पण त्यांची पूर्ती करायचे असते, हे ते विसरूनच गेले.’’ शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य वक्त्यांनीही या वेळी केंद्र व राज्य सरकारांवर हल्ला करून भारतीय जनता पार्टीवर टीका केली.मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांच्या काळात ढीगभर योजना जाहीर केल्या. त्यातील अनेक प्रत्यक्षात आल्याच नाहीत. ज्या आल्या त्या लोकांना दिसल्याच नाहीत, कारण त्यात काहीच काम झाले नाही. स्मार्ट सिटी योजनाही अशीच आहे. त्यातील कोणते काम दिसते, हे कोणालाच सांगता येत नाही. आकडे कोट्यवधीचे सांगितले जातात; पण ते कामातून दिसायला तयार नाहीत.-अशोक चव्हाण
मोदींच्या योजना भुलवण्यासाठीच - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 1:47 AM