पुणे : ‘भाजप हा जनाधार असलेला पक्ष आहे. पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभर विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन काही मंडळी येत असतील तर तो निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. परंतु, काँग्रेसचे कुणी संपर्कात आहेत असे मानण्याचे कारण नाही. कारण ज्या पक्षाला नेतृत्वच नाही अशा पक्षातील नेते सक्षम नेतृत्व असलेल्या पक्षाकडे येण्याचा कल राहीलच,’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या चर्चेबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. त्यामुळे भविष्यातील वाटचालींकरिता लोक मार्ग शोधतीलच.’
ईडीच्या फोननंतर लोक भाजपमध्ये जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर ते म्हणाले, ‘ईडीचे फोन आले असते तर पटोले यांनी भाजप सोडला नसता. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे. त्यामुळे आता काँग्रेसला कुणी वाचवू शकेल असे वाटत नाही.’