पुणे : मराठा समाजाचे आरक्षण घालवण्यात मंत्री अशोक चव्हाण यांचाच प्रमुख हात आहे. या गोष्टीला राज्य शासनाचा मूक पाठिंबा असल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले, असा गंभीर आरोप करत याविरोधात आम्ही येत्या ५ जूनला बीडपासून मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुण्यात दिला.
गेल्या वर्षभरापासून अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. २४) विनायक मेटे हे सारथी संस्थेत आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण आणि राज्य शासनावर त्यांनी टीका केली.
विनायक मेटे म्हणाले की, राज्य शासनाने न्यायालयात मराठा समाजाची योग्य माहिती सादर केली नाही. त्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. याला सर्वस्वी चव्हाण आणि राज्य शासन जबाबदार आहे. त्यामुळे येत्या ५ जूनपासून बीडमधून मोर्चा काढणार आहे. हा मूक मोर्चा नसून बोलका मोर्चा असणार आहे. तसेच कोणत्याही एका संघटनेचा नसून संपूर्ण समाजाचा मोर्चा असणार आहे.
चौकट
‘ओबीसी नेता’ होण्याची वडेट्टीवारांना घाई
“मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना राज्यातील ओबीसींचा नेता होण्याची घाई झाली आहे. कारण, त्यामुळेच मराठा आरक्षणबाबत नको ते वक्तव्य ते करत आहेत. परंतु, ओबीसींचा नेता कोणी व्हायचे हे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी बसून ठरवायचे आहे,” असा टोला विनायक मेटे यांनी लगावला.
चौकट
संभाजीराजे वेगळी भूमिका घेतील तेव्हा बोलू
छत्रपती संभाजीराजे येत्या २७ मे रोजी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. यासंदर्भात विनायक मेटे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे यांचे सध्या काम चांगले सुरू आहे. राज्य शासनाबरोबर ते आणि मी एकाच भूमिकेतून काम करत आहोत. जर त्यांनी वेगळी काही भूमिका घेतली, तर तेव्हा बोलता येईल.