पुणे : गणेशोत्सवातील एक निष्ठावान कार्यकर्ता... मानवसेवेचे महामंदिर उभे करण्याकरीता स्वत:चे घर व आरोग्यावर तुळशीपत्र ठेवणारा कार्यकर्ता...लोकाभिमुख काम करणारे पितृतुल्य नेतृत्व... असे गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकराव गोडसे यांचे निधन झाल्याने गणपती मंडळाचा दीपस्तंभ कोसळला, अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेत अशोक गोडसे यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना अश्रू देखील अनावर झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरीता नारायण पेठेतील केसरी वाडा येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रा.स्व. संघाचे कार्यवाह महेश करपे, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, कर्नल सुरेश पाटील, विवेक खटावकर, शिरीष मोहिते, पोलीस अधिकारी मकरंद रानडे, दीपक मानकर, डॉ.सतिश देसाई, सुरेश पवार, संजय मोरे, डॉ.अजय चंदनवाले, पिंगोरी ग्रामस्थ बाबा शिंदे यांसह राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती व मानाच्या, प्रमुख आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीष बापट म्हणाले, गणेशोत्सव मंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करीत आहे. त्याचे नेतृत्व अशोक गोडसे करीत होते. कमी बोलून काम करणे हे त्यांचे वैशिष्टय होते. देशातील व महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना दिशा देण्याचे काम दगडूशेठ गणपती ट्रस्टने केले असून यात अशोकरावांचा मोठा वाटा आहे. समाजाकडून येणारा पैसा समाजासाठी वापरण्याची दानत व बुद्धी या ट्रस्टच्या विश्वस्तांकडे असून अखंड सेवेचे व्रत अशोकरावांनी घेतले होते.
अशोकरावांच्या रुपाने एक वेगळा कार्यकर्ता पुण्यात घडला
''कोविड काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अशोकरावांनी दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून घेतला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांनी याचे अनुकरण केले. कोविडचा प्रार्दुभाव नियंत्रणात ठेवण्यात यामुळेच यश आले. याचे श्रेय अशोकरावांना जाते. मितभाषी, सुस्वभावी असे अशोकरावांचे व्यक्तिमत्व होते. सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जाणीव त्यांच्या कार्यातून नेहमी दिसत होती. अशोकरावांच्या रुपाने एक वेगळा कार्यकर्ता पुण्यात घडला असून तात्यासाहेब गोडसे यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी ख-या अर्थाने पुढे नेला असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.''
गणेशोत्सव हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रात सर्वत्र आहे
''अखिल भारतीय गणेशोत्सव समितीत अशोक गोडसे यांनी माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. गणेशोत्सव हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रात सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणांची परिस्थिती लक्षात घेऊन उत्सवाचा विचार व्हावा, असा अशोकरावांचा नेहमी आग्रह असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.''