उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शुक्रवारी (दि. १७) पहाटे होलसेल साडी डेपो, लाकडी चौकटी, वस्तूंच्या गोडाऊनला व लाकडी फर्निचर बनविणा-या कारखान्यासह भंगार खरेदी-विक्री दुकान व लगत असलेल्या अन्य काही दुकानांना मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यात एकूण ६ दुकाने खाक झाल्याने सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल खात्याने वर्तविला आहे.आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू शकले नाही; पण शॉर्ट सर्किट, सिगारेट, विडी थोटके वा गॅस सिलिंडर स्फोट यांपैकी कशामुळे ही घटना घडली, हे तपासले जात आहे.दरम्यान, अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील चौधरीवस्ती नजीक ही घटना आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. पहाटे चारच्या सुमारास अग्निशामक दलाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशामक दल हडपसरची एक फायरगाडी व मुख्यालयातून दोन वॉटर ब्राउझर टँकरसह घटनास्थळाकडे रवाना झाले.दोन सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळाहून ३ सिलिंडर जवानांनी बाहेर काढले; पण साडी, लाकडी फर्निचर व भंगार तसेच जुन्या लाकडी वस्तूंच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत येथील सर्व दुकाने मालासह संपूर्ण जळून खाक झाली आहेत.सुमारे १५ गुंठ्यांमध्ये असलेले साडीचे गोडाऊन व जुन्या सागवानी लाकडाचे मोठे गोडाऊन जळाले आहे. दरम्यान, साडीच्या दुकानात सर्वांत आधी आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.आग विझविण्यासाठी हडपसर व मध्यवर्ती अग्निशामक केंद्राचे कर्मचारी- तीन बंबांच्या साह्याने सुमारे ५ तास आग विझवत होते. यामध्ये मध्यवर्ती अग्निशामक केंद्राचे अधिकारी प्रमोद सोनावणे, मुख्य अग्निशामक अधिकारी तानाजी गायकवाड, कर्मचारी सोमनाथ मोरे, कैलास टकले, शैलेश गोरे, महेंद्र सपकाळ, चंद्रकांत नवले, विलास धडस असे एकूण १५ कर्मचारी सहभागी झाले होते. मंडलाधिकारी किशोर शिंगोटे व लोणी काळभोर पोलीस यांनी पंचनामा केला.
उरुळी कांचनला सहा दुकाने खाक, दोन कोटींच्या नुकसानीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:21 AM