लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “सध्याच्या घडीला भेडसावणाऱ्या आर्थिक बाबींशी निगडित विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी तीन दिवसीय आशिया आर्थिक परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात आभासी होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या बीजभाषणाने होईल,” अशी माहिती पाकिस्तान, चीन आणि भूतानमधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावले यांनी दिली.
भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय परिषदेत देशातील तसेच जगातील अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि धोरणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. गौतम बंबावले या परिषदेचे समन्वयक आहेत.
‘रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ इन अ पोस्ट पॅनडेमिक वर्ल्ड’ या विषयावरील परिसंवाद फोर्बज् अँड मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्बज् यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात डॉ. जयशंकर यांच्यासह जपान, ऑस्ट्रेलिया, मालदीव, मॉरीशस व भूतानचे परराष्ट्रमंत्रीही सहभागी होतील. उद्घाटन सत्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही विचार मांडणार आहेत.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशलेकर प्रास्ताविक करणार आहेत.
या जागतिक परिषदेसाठी पूर्व नावनोंदणी बंधनकारक असून https://vconfex.com/site/asia-
economic-dialogue-2021/808 या संकेततस्थळावरून नोंदणी करता येईल.
चौकट
आर्थिक परिणाम समजून घेण्यासाठी
‘कोविड १९ मुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासावर व स्थैर्यावर झालेले परिणाम आणि आव्हाने समजून घेण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. येत्या काही दशकात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी जगातील आणि प्रामुख्याने आशियातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांनी अंगीकारावी अशा धोरण व उपायांविषयीही परिषदेत सविस्तर चर्चा होईल.”
-डॉ. विजय केळकर, उपाध्यक्ष, पीआयसी
चौकट
दिग्गजांचा सहभाग
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. ऊर्जित पटेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक डॉ. मेहमूद मोहिलदिन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक लॉर्ड मेघनाद देसाई, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, मित्सुबिशी कॉर्पोरेशनचे संचालक मामोरु योक्को, फाईव्ह एफ वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन यांच्यासह अनेक आशियाई देशांमधील जाणकार या परिषदेत सहभागी होत आहेत.