पुणे - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पैठणमधून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तसेच, पूरपरिस्थीतीत सरकार कुठं गायब होतं ? असा सवालही विचारला आहे.
राज्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने नाशिक जिल्हयातील बागलाण येथे यात्रा स्थगित केली आली होती. आता पूरस्थिती निवळत असल्याने पुन्हा यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी, पैठण मतदारसंघातून यात्रेला प्रारंभ होताच, खासदार अमोल कोल्हेंनी शिवसेनेवर प्रहार केला. जनआशीर्वाद यात्रा घेऊन ते आले का नाहीत अजून ? असे म्हणत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना तुम्ही प्रश्न विचारा असे आवाहनही अमोल कोल्हेंनी उपस्थित पैठणकरांना केले. आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारा की, पैठण मतदारसंघाचे प्रश्न विचारायला कधीतरी आलात का?. जनआशीर्वाद घ्यायला तुम्ही महाराष्ट्रात फिरता. मग, पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर आणि कराडमध्ये का नाही गेलात? तेथील लोकं कशी तुम्हाला आशीर्वाद देतील? पैठणमधील तुमचा आमदार नीट काम करतो, काय-काय करतो? हेही विचारा असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर सडकून टीका केली.
तसेच, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुमचा पक्ष पुढे जातो. त्या पक्षाच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आठवण करुन देण्याची गरज आली आहे. जनतेची सेवा, जनतेचं काम हीच शिवरायांची शिकवण असून त्याचा विसर शिवसेनेला पडल्याचा टोलाही खासदार कोल्हे यांनी लगावला.