राजगुरूनगर : लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून कडधे (ता. खेड) येथे खुनाची घटना घडली आहे. शंकर शांताराम नाईकडे (वय ४०, रा. कडधे, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सहा जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कडधे ता. खेड येथे (दि. २४) रात्री लग्नाची वरात होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून तो धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची, भांडणे झाली. दरम्यान, वासुदेव गेणभाऊ बोंबले, पवन बोंबले (रा. वेताळे, ता. खेड), स्वप्नील बबन सावंत, नीलेश पाराजी नाईकडे, ऋषिकेश ऊर्फ लखन नाईकडे, विलास बाबूराव परसुडे (रा. कडधे, ता. खेड) व इतर युवकांनी त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवून दगड, विटांनी डोक्यावर गंभीर मारहाण केली.
त्याचा मृतदेह एका वाहनात घालून चासकमान धरणाच्या वाहणाऱ्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिला.मयत शंकर याला गुन्ह्याची पार्श्वभूमी असल्याने गाव परिसरात दहशत होती. त्याच्यावर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. या खूनप्रकरणी मयत शंकर याची पत्नी सुषमा नाईकडे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी (दि. २५) रात्री साडेबारानंतर घडलेल्या या घटनेतील मयताचा मृतदेह शोधण्यासाठी कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती कालवा प्रशासनाला करण्यात आली.