पुणे : राज्य शासन लस पुरवठा करताना पुणे महापालिकेशी दुजाभाव करीत आहे, असा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून किती लस आल्या, किती कमी पडल्या याचा तपशील पत्रकारांनी विचारला. त्यावेळी मात्र धड आकडेवारी न देता आल्याने मुळीक यांची चांगलीच भंबेरी उडाली. राज्य शासन पुणे महापालिकेवर अन्याय करीत असल्याचा पुनरुच्चार करीत त्यांनी महापालिकेनेच आता लस खरेदीचा निर्णय घेतल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
हा प्रसंग घडला सोमवारी (दि. १७) भाजपाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत. तत्पूर्वी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील सांगण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
मुळीक यांनी प्रारंभीच कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवली असे म्हणत राज्य सरकारवर दोषारोप सुरू केले. लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत आम्ही आयुक्तांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. “भाजपचे शिष्टमंडळ वारंवार आयुक्तांची भेट घेते परंतु, यातून निष्पन्न काय? होते? शहरातील भाजपचे सहा आमदार, दोन खासदार करतात काय? ते केंद्र शासनाला, राज्य शासनाला जाब काय? विचारत नाहीत? केवळ महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन काय,” असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावर बोलणे त्यांनी टाळले.
महापौर एकीकडे लस खरेदीसाठी प्रशासनाला आदेश देतात आणि दुसरीकडे सभागृह नेते राज्य शासनाकडे परवानगी मागतात. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का, याबाबत विचारले असता मुळीक यांनी ‘असे काही नसून, आज आम्ही पक्ष म्हणून महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली,’ असे सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही मुळीक यावेळी म्हणाले.