लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार आम्ही केलेला नाही. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की मंदिराच्या आतील बाजूच्या कामासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी खर्च होईल. मंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतात,” असा अंदाज श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले.
अयोध्या परिसराच्या विकासासाठी एका ‘बड्या’ कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र हे नाव मी जाहीर करणार नाही, असे सांगून त्यांनी यासंंबंधी मौन पाळले. गुुरवारी (दि. ३१) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील सामान्य व्यक्तीला देखील मंदिरासाठी दान करता यावे, त्याच्या दानातून मंदिर उभारले जावे. ही बाब सामान्य व्यक्तीच्या रामभक्तीला समाधान देणारी आहे. मंदिरासाठी जनतेकडून दान स्विकारण्याचा मूळ हेतू हाच आहे, असे स्वामी गोविंददेव यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे मुंबई प्रदेश मंत्री शंकर गायकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव , प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे , शहर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, अयोध्या मंदिरासाठी येत्या मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलन केले जाणार आहे. यासाठी एक हजार रुपये, शंभर रुपये आणि दहा रुपयांची कुपन छापली आहे. एकूण ५०० कोटी रुपयांची ही कुपन छापलेली आहेत. या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावातील ५० लाख कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.
मंदिरासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जात आहे. परदेशी निधी घेण्याची परवानगी सध्या नाही. ती मिळाल्यास परदेशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज स्वामी गोविंददेव गिरी यांनी वर्तविला.