पुणे : जरांगे पाटील आज बढो हमी तुम्हारे साथ है, एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत लाखोंचा मराठा बांधवांचा समुदाय पुणे शहरात दाखल झाला आहे. शहरात अनेक चौकात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत केलं जातंय. असंख्य मराठा बांधव आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईला चालले आहेत. त्यांना आरक्षण द्यावंच लागेल, आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय, भीक मागत नाहीये अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिल्या आहेत.
सकाळी वाघोलीपासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हातात झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, एका मराठा लाख मराठाच्या पताका, टाळ - मृदंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. प्रमुख रस्त्यावरून मोर्चा जात असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. खराडीपासून मोर्चा ज्याप्रमाणे पुढे जाईल. तशी वाहतूक सुरळीत केली जात आहे. शिवाजीनगर - संचेती हॉस्पिटल परिसरातही थोड्याच वेळात मोर्चा दाखल होणार आहे. त्याठिकाणी १०० किलोचा हार अर्पण करून तसेच फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मोर्चात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे. तसेच बांधवांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.
मोर्चात नवी जोडपी सहभागी
काही नवी जोडपी मोर्चात सहभागी झाली आहेत. आपल्या लहान बाळाला घेऊन ते जरांगे पाटलांसोबत मुंबईला चालले आहेत. जर आरक्षण मिळालं तर आमच्या मुलाचं भविष्य उज्वल होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
जरांगे पाटलांना सर्वच समाजाचा पूर्णपणे पाठिंबा
जरांगे पाटलांच्या या मोर्चामध्ये मराठा समाजाबरोबरच अन्य समाजही सहभागी झाल्याचे मराठा बांधवानी सांगितले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये मुस्लिम बांधवांकडून या मोर्चाचे स्वागत करण्यात येत आहे.
संभाजीराजेंचा स्वराज्य पक्ष करणार मनोज जरांगे पाटीलांचे स्वागत
मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटीलांचे ‘स्वराज्य’ च्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. संचेती हॉस्पिटलजवळ पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.