पुणे, दि. 20 : सध्या आजूबाजूला सुरु असलेली असुरक्षितता, मुस्कटदाबी पाहिली असता मन उद्विग्न होत आहे. मात्र या उद्विग्नतेने निराश न होता शासन आणि व्यवस्थेला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून सोडावे असे आवाहन ज्येष्ठ दिगदर्शक व अभिनेते अमोल पालेकर यांनी केले.सकाळी मुसळधार पावसात महर्षी शिंदे पुलावरून सुरु झालेली अंनिसची "जबाब दो" निषेध रॅली साने गुरुजी स्मारक येथे पोहचली. त्यावेळी तिथे झालेल्या निर्धार सभेत अमोल पालेकर बोलत होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मुक्ता मनोहर, श्रीपाल ललवाणी उपस्थित होते. बोगद्यातून जाताना सर्वत्र अंधकार असताना टोकाला उजेडाचा कवडसा दिसत असतो. तसा सगळीकडे अंधकार असतानाही निराश न होता व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून टाकावे असे अमोल पालेकर यांनी सांगितले.
स्वातंत्रा नंतर ७० वर्षांनी सुराज्याची अवस्था पाहिली असता आज समाज सुधारणेचा आग्रह धरणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांची आठवण येत आहे. त्यामुळे नव्या स्वातंत्र लढ्याची सुरुवात केली पाहिजे असे विद्या बाळ यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात शासनाकडून फसवणूक आल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त सकाळी रॅली काढण्यात आली. डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱयांना कधी पकडणार याचा शासनाला जाब विचारण्यासाठी ही रॅली निघाली आहे. रॅलीची सुरुवात करताना बाबा आढाव म्हणाले, "एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या हत्या, हे चित्र पाहता सरकारला दहशतवाद पोसायचा असल्याचे दिसून येते." रॅलीमध्ये मुकता मनोहर, हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.